बुलढाणा/मुंबई,(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 4 ऑगस्ट-आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय 47) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant) करण्यात आले. या शस्त्रक्रियेत त्यांच्या पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून 2 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पाठपुराव्यामुळे टाटा ट्रस्टकडून 19 लाख 60 हजार रुपयांची मदत मिळाली. त्यामुळे एकूण 21 लाख 60 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आणि खर्चिक यकृत प्रत्यारोपण शक्य झाले.
प्रशांत इंगळे अकोला येथे केबल टाकण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी, महाविद्यालयात शिकणारी मुलगी आणि दहावीत शिकणारा मुलगा आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर 2025 मध्ये त्यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तपासणीनंतर त्यांचे यकृत गंभीररीत्या निकामी होत असल्याचे निदान झाले आणि डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला.
मात्र, उपचारासाठी लागणारा 25 ते 30 लाख रुपयांचा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. अशा वेळी पत्नी वर्षा इंगळे यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाशी संपर्क साधला. कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रभावी पाठपुरावा केला.
या आर्थिक सहाय्यामुळे 25 जून 2026 रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने 13 जुलै 2026 रोजी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते हळूहळू बरे होत आहेत.
प्रशांत इंगळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वेळेवर आर्थिक मदत मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आणि टाटा ट्रस्ट यांचे आभार मानले.
रामेश्वर नाईक यांची प्रतिक्रिया
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचा उपचार पैशांअभावी थांबू नये, या उद्देशाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातत्याने कार्यरत आहे. प्रशांत इंगळे यांना वेळेत आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून देता आली, याचा आम्हाला आनंद आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी 1800 123 2211 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.”








