शेगाव I (डी ललित) : शहरातील परिचित बुरुंगले विद्यालयाशी गेल्या चार दशकांपासून जिव्हाळ्याचे नाते जपणारे आणि विद्यार्थ्यांना आपुलकीने मार्गदर्शन करणारे धर्मा रामचंद्र बुरुंगले अर्थात ‘धर्मा काका’ येत्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तब्बल ४० वर्षांची त्यांची निस्वार्थ सेवा संपणार असली, तरी विद्यार्थ्यांच्या मनातील ‘धर्मा काका’ मात्र कायम स्मरणात राहणार आहेत.
बुरुंगले विद्यालयाची स्थापना सुमारे ४३ वर्षांपूर्वी झाली. सुरुवातीच्या काळात शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे शक्य होते. त्यावेळी विद्यार्थ्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती म्हणून धर्मा काकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
शाळेच्या परिसरालगत रेल्वे मार्ग असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचीही धर्मा काका विशेष काळजी घेत असत. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी रेल्वे मार्गाजवळ जाताना कोणती काळजी घ्यावी, सुरक्षितपणे घरी कसे जावे, याबाबत ते विद्यार्थ्यांना वेळोवेळी सूचना देत. त्यामुळे ते केवळ शाळेतील कर्मचारी राहिले नाहीत, तर विद्यार्थ्यांसाठी आपुलकीचा आधार आणि मार्गदर्शक बनले.
शाळेतील अनेक पिढ्यांनी धर्मा काकांचे प्रेम, आपुलकी आणि शिस्त अनुभवली आहे. विद्यार्थ्यांना रागावतानाही त्यामागे असलेली काळजी जाणवत असे. त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या ओठांवर त्यांचे नाव नेहमीच आदराने आणि प्रेमाने ‘धर्मा काका’ असेच राहिले.
आज अनेक माजी विद्यार्थी आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावले आहेत. मात्र बुरुंगले विद्यालयाच्या आठवणींमध्ये धर्मा काकांचे स्थान आजही तितकेच खास आहे.
३१ ऑगस्ट रोजी धर्मा काका सेवेतून निवृत्त होतील; पण चार दशकांत त्यांनी जपलेले विद्यार्थी आणि त्यांच्याशी निर्माण झालेले जिव्हाळ्याचे नाते कधीच निवृत्त होणार नाही. विद्यार्थ्यांना आपुलकीने जपणारा, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारा आणि प्रत्येकाला प्रेमाने समजून घेणारा ‘धर्मा काका’ पुन्हा मिळणे खरोखरच कठीण आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








