शेगाव : (डी ललित) : श्री गजानन महाराज मंदिर संस्थानमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव पिंप्री (ता. संग्रामपूर) येथील वनमाला अरुण तेल्हारकर (वय ५०) या गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी शेगाव येथे आल्या होत्या. १९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० वाजेदरम्यान मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने भाविकांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये वनमाला तेल्हारकर यांचे ३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, स्वाती खडसे यांचे ३ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ज्योती खडसे यांचे ४.३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, मोहन खानझोडे यांची २० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, रुपाली भरसाखळे यांचे १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि कल्पना बोकळे यांचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण यांचा समावेश आहे.
एकूण ५१.५० ग्रॅम सोन्याचे दागिने, अंदाजे २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वनमाला तेल्हारकर यांच्या तोंडी रिपोर्टवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कलम ३०३(२) BNS अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेका आघाव करीत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








