पळशी झाशी (आकाश बोरसे): गावातील कैलास मारोडे यांच्या घरात झालेल्या जबरी चोरीचा तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी, अन्यथा तामगाव पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पळशी झाशी ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीचा ठराव आणि ग्रामस्थांचे निवेदन तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांना सादर करण्यात आले.
१९ ऑगस्टच्या रात्री गावाच्या मध्यवस्तीत असलेल्या कैलास मारोडे यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील अंदाजे लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच एक लाख रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेला आठवडा उलटूनही चोरीचा तपास लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. तपासाच्या अनुषंगाने अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, खामगाव तसेच डीवायएसपी, मलकापूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मात्र अद्याप चोरीचा तपास ठोस दिशेने पुढे न गेल्याने ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे.
चोरीचा तपास तातडीने पूर्ण करून आरोपींना जेरबंद करावे आणि गावातील नागरिकांना सुरक्षिततेची भावना निर्माण करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीने याबाबत ठराव घेऊन तो जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेही सादर केला आहे. चोरीचा तपास लवकरात लवकर न लागल्यास तामगाव पोलीस ठाण्यासमोर शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत विविध आंदोलन करण्यात येतील, असा इशारा देण्यात आल्याने या प्रकरणाकडे परिसराचे लक्ष लागले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








