शेगाव (डी ललित) : शेगाव शहरातील रेल्वे स्टेशनसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांना व नागरिकांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी केल्याप्रकरणी दोन वाहनचालकांविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वाजेदरम्यान शहरात टाउन पेट्रोलिंग सुरू असताना पोलिसांना रेल्वे स्टेशनसमोरील सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी वाहने धोकादायक पद्धतीने उभी असल्याचे आढळून आले.
पहिल्या प्रकरणात विजय साहेबराव अजने (वय 41, रा. रेणुका नगर, शेगाव) हे वाहन क्रमांक MH 12 EZ 6730 सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी उभे करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना व नागरिकांना धोका निर्माण होईल अशा स्थितीत गप्पा मारताना आढळून आल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद आहे. याप्रकरणी कलम 285 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसऱ्या प्रकरणात अनिल रामभाऊ सोळंके (वय 50, रा. खामगाव) हे MH 28 R 3289 क्रमांकाची मॅजिक वाहन रेल्वे स्टेशनसमोरील सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक स्थितीत उभी करून असल्याचे पोलिसांना आढळले. याप्रकरणी कलम 285 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस उपनिरीक्षक भामोदकर करीत आहेत. सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल किंवा नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








