जखमींवर उपचारादरम्यान एक्स-रे मशीन बंद असल्याची नातेवाईकांची तक्रार; रुग्णवाहिकेसाठीही प्रतीक्षा!!
शेगाव | (डी. ललित) : रक्षाबंधनानिमित्त भावाला राखी बांधण्यासाठी प्रवासाला निघालेल्या महिलांवर शेगाव बसस्थानकात शुक्रवारी दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास दुर्घटनेचा प्रसंग ओढवला. बसची प्रतीक्षा करत असताना बसस्थानकाच्या जीर्ण इमारतीच्या छतावरील सिमेंट-काँक्रीटचा मोठा भाग अचानक कोसळल्याने तीन महिला आणि एका तीन वर्षीय चिमुकल्यासह चौघे जखमी झाले. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.या दुर्घटनेत अंबोडा, ता. नांदुरा येथील कोमल गणेश बावस्कर (३५), रेखा रामदास बावस्कर (४०), तीन वर्षीय रुद्र गणेश बावस्कर तसेच भिलखेड, ता. संग्रामपूर येथील विमलबाई भिकाजी पवार (६०) हे जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी बसस्थानकाच्या इमारतीत बसची प्रतीक्षा करीत असताना अचानक छतावरील सिमेंट-काँक्रीटचा भाग त्यांच्या अंगावर कोसळला. घटनेनंतर प्रवासी आणि बसस्थानक कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले.बसस्थानकावरील पोलीस चौकीचे चौकीप्रमुख तथा पोलीस हेडकॉन्स्टेबल श्याम आघाव, पोलीस कॉन्स्टेबल विजय तायडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश तायडे तसेच बसस्थानक कर्मचाऱ्यांनी मदतकार्य केले. त्यानंतर जखमींना सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
एक्स-रे मशीन बंद असल्याची नातेवाईकांची तक्रार
दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आवश्यक तपासण्या वेळेत झाल्या नसल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. छताचा सिमेंट-काँक्रीटचा भाग अंगावर पडल्याने हाडांना किंवा अंतर्गत अवयवांना दुखापत झाली आहे का, हे तपासण्यासाठी एक्स-रे आवश्यक असताना रुग्णालयातील एक्स-रे मशीन बंद असल्याचे सांगण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केला.
दोन ते तीन तास उलटूनही केवळ ड्रेसिंग करण्यात आल्याची तक्रारही त्यांनी केली. ‘उद्या सकाळी ११ वाजता एक्स-रे होईल,’ असे सांगण्यात आल्याने आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक तपासणीसाठी इतका वेळ का लागतो, असा सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला. एक्स-रेची सुविधा उपलब्ध नसल्याने बाहेरील केंद्रातून तपासणी करून घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचेही नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र, या संदर्भात रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
रुग्णवाहिकेसाठी प्रतीक्षा; खासगी वाहनाने पुढील उपचार
जखमींना पुढील उपचारासाठी हलविण्याची गरज निर्माण झाल्यानंतर रुग्णवाहिकेसाठीही प्रतीक्षा करावी लागल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. रुग्णवाहिका रात्री साडेनऊ वाजता उपलब्ध होईल, असे सांगण्यात आल्याने अखेर नातेवाईकांनी खासगी ऑटोची व्यवस्था करून जखमींना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविल्याचे सांगण्यात आले.
या प्रकारामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका सेवा आणि आवश्यक वैद्यकीय तपासणी सुविधा वेळेत उपलब्ध होतात का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बसस्थानकाच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर
शेगाव हे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने बसस्थानकावर दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असते. अशा ठिकाणी छताचा भाग कोसळून प्रवासी जखमी झाल्याने बसस्थानकाच्या इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. इमारतीची नियमित पाहणी केली जाते का? धोकादायक भागांची दुरुस्ती वेळेत का करण्यात आली नाही? भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासन कोणत्या उपाययोजना करणार? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
तसेच, सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालयावर शेगावसह परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपचारासाठी अवलंबून आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत एक्स-रेसारखी मूलभूत तपासणी सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
बंद वैद्यकीय उपकरणे तातडीने सुरू करावीत, आवश्यक तपासणी व औषधांची उपलब्धता सुनिश्चित करावी, आपत्कालीन विभाग सक्षम करावा आणि रुग्णवाहिका सेवा सुरळीत ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बसस्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षेपासून ते शासकीय रुग्णालयातील आपत्कालीन सुविधांपर्यंत समोर आलेल्या या दोन्ही प्रश्नांवर संबंधित प्रशासन काय पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇🏻








