शेगाव (डी ललित) : शहरातील आरोग्य कॉलनी परिसरात मंदिरातून घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सुमारे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी बळजबरीने हिसकावून पळ काढल्याची घटना सोमवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.
याप्रकरणी योगीता ज्ञानेश्वर काळमेघ (वय ३३, रा. आरोग्य कॉलनी, शेगाव) यांनी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्या आरोग्य कॉलनीतील श्रीकृष्ण मंदिरातून घरी जात असताना गोलखेड रोडवरील महेश मुरलीधर पवार यांच्या घराजवळ दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरून आले. त्यांनी काळमेघ यांच्या गळ्यातील अंदाजे १२ ग्रॅम वजनाचे व ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेनंतर महिलेने दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात कलम ३०९(४), ३(५) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत चोरीस गेलेला ऐवज अद्याप पोलिसांना मिळालेला नाही.
या प्रकरणाचा पुढील तपास जीपीएसआय गजानन गावंडे करीत आहेत. अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)








