६३ कौशल्य प्रकारांचा समावेश; पात्र युवकांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन!
बुलडाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : विविध क्षेत्रांत कौशल्य असलेल्या युवकांना आपले कौशल्य राष्ट्रीय स्तरावर सादर करण्याची संधी मिळणार आहे. India Skills Competition 2026-27 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.
या स्पर्धेत रंगकाम, मातीकाम, सुतारकाम, शेती, दागिने बनविणे, फॅशन टेक्नॉलॉजी, छायाचित्रण, चित्रकला, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डिंग, बेकरी, सौंदर्यशास्त्र, सायबर सिक्युरिटी, माहिती तंत्रज्ञान आणि दंत चिकित्सा यांसह एकूण ६३ कौशल्य प्रकारांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोणत्याही विशिष्ट शैक्षणिक पात्रतेची अट नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील तसेच कमी औपचारिक शिक्षण घेतलेले, मात्र एखाद्या क्षेत्रात उत्कृष्ट कौशल्य असलेले युवकही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
इच्छुक उमेदवारांनी skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, शैक्षणिक माहिती तसेच संबंधित कौशल्याची माहिती भरावी लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज करताना काही अडचण आल्यास बुलडाणा बसस्थानक परिसरालगत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पात्र युवकांसाठी मोठी संधी
ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना आपल्या पारंपरिक तसेच आधुनिक कौशल्यांना राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी India Skills Competition महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र युवकांनी या संधीचा लाभ घेत जास्तीत जास्त संख्येने नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.








