---Advertisement---

Sangrampur News: समाजकारण, राजकारण आणि व्यवसायाचा अनोखा संगम; अशोक मुरुख यांच्या कार्यामुळे चोंढी गावाची विकासाकडे वाटचाल!!

---Advertisement---

नवोदय विद्यालयापासून समाजकारणापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; मत्स्यपालनातून रोजगारनिर्मिती!

संग्रामपूर(युवा क्रांती वृत्तसेवा) : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले संग्रामपूर तालुक्यातील चोंढी हे छोटेसे गाव. सामान्य आणि अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या अशोक मुरुख यांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण आणि व्यवसाय या चारही क्षेत्रांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांना सोबत घेत केलेल्या विविध कामांमुळे चोंढी गावाच्या विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे.

अशोक मुरुख यांचे वडील ज्ञानदेवराव मुरुख हे सामाजिक कार्याची आवड असलेले व्यक्तिमत्त्व. सन १९९५ मध्ये चोंढी गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्यावेळी ज्ञानदेवराव यांनी पुढाकार घेत स्वतःच्या शेतातील जागा बोअरवेलसाठी उपलब्ध करून दिली. या माध्यमातून गावाला पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वडिलांकडून मिळालेल्या समाजसेवेच्या संस्कारांचा अशोक यांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव पडला.

पाच किलोमीटरची पायपीट ते नवोदय विद्यालय

अशोक मुरुख यांचे बालपण अत्यंत सामान्य परिस्थितीत गेले. कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती. चोंढी गावात त्यावेळी केवळ तिसरीपर्यंतच शाळा होती. त्यामुळे चौथी आणि पाचवीचे शिक्षण घेण्यासाठी अशोक यांना दररोज सुमारे पाच किलोमीटर पायी चालत मडाखेड येथे जावे लागत असे.

अभ्यासातील हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर सहावीत त्यांची निवड जवाहर नवोदय विद्यालयासाठी झाली. पुढील शिक्षण त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथे घेतले. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण अकोला येथे पूर्ण केले. नवोदय विद्यालयातील शिस्त, संस्कार आणि विपरीत परिस्थितीतही जिद्दीने पुढे जाण्याची शिकवण त्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली.

नोकरीऐवजी समाजकारणाचा मार्ग

उच्च शिक्षणानंतर नोकरी करून स्थिरस्थावर व्हावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. मात्र अशोक मुरुख यांनी तत्कालीन परिस्थितीचा विचार करून समाजकारण आणि राजकारणाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा घेत त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

जळगाव जामोद येथील एस.के.के. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच सन २००७ मध्ये चोंढी ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. ग्रामस्थांचा आग्रह, समाजकारणाची आवड आणि त्यांच्यावरील विश्वास यामुळे त्यांनी निवडणूक लढवली. पहिल्याच प्रयत्नात ते गावचे सरपंच झाले. कमी वयात सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात तरुण सरपंच म्हणून विशेष ओळख निर्माण केली.

मत्स्यपालनातून रोजगाराची नवी संधी

शेतीला जोडधंदा म्हणून मत्स्यपालन व्यवसायालाही चालना देण्याचा प्रयत्न अशोक मुरुख यांनी केला. सिंचन प्रकल्पामुळे उपलब्ध झालेल्या जलस्रोताचा उपयोग करून मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यात आले. या माध्यमातून गावातील नागरिकांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली.

शेती, मत्स्यपालन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून शाश्वत व्यवसाय उभा करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या ते शेती आणि मत्स्य व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करीत आहेत.

राजकारणासोबत सामाजिक बांधिलकी

अशोक मुरुख यांचा प्रवास केवळ राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही. गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तालुका व जिल्हास्तरावर मांडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. गावातील तरुणांना सोबत घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यावर त्यांचा भर आहे.

सन २०१२ ते २०२४ या कालावधीत त्यांनी आमदार डॉ. संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. या काळात त्यांना व्यापक प्रशासकीय आणि राजकीय अनुभव मिळाला. मात्र कुटुंबाला वेळ देण्यासाठी सन २०२४ पासून त्यांनी आपले लक्ष पुन्हा शेती आणि व्यवसायाकडे वळविले आहे.

‘घरकुल’ अनुदान परत करून दिला सामाजिक संदेश

आर्थिक परिस्थिती सक्षम असलेल्या व्यक्तींनी गरजूंसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. याच भूमिकेतून त्यांनी घरकुलाचे अनुदान परत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला.

“सरकारी योजनांचा लाभ त्या योजनांसाठी खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या गरजू व्यक्तींनाच मिळाला पाहिजे,” असा संदेश त्यांनी दिला आहे.

नवोदय परिवारासाठीही योगदान

जवाहर नवोदय विद्यालयाने आपल्या जीवनाला दिशा दिल्याचे अशोक मुरुख सांगतात. त्यामुळे ‘नवोदय’चे ऋण फेडण्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून ते सक्रियपणे काम करीत आहेत. देश-विदेशातील सुमारे तीन लाख माजी विद्यार्थ्यांना जोडणाऱ्या नवोदय परिवाराच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना हातभार लावण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

“विपरीत परिस्थितीत कसे जगायचे, संघर्ष करून पुढे कसे जायचे आणि समाजासाठी काम कसे करायचे, याची शिकवण मला नवोदय विद्यालयातून मिळाली. त्या ऋणाची परतफेड करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांसाठी वेळ देण्याचा माझा प्रयत्न असतो,” असे अशोक मुरुख सांगतात.

नव्या पिढीसाठी संदेश

समाजकारण, राजकारण आणि व्यवसायात यश मिळवायचे असेल तर आधी आपल्या कुटुंबाचे भवितव्य सुरक्षित करणे गरजेचे आहे, असा त्यांचा संदेश आहे. “व्यवसाय-उद्योगाच्या माध्यमातून आधी आपले आणि कुटुंबाचे भवितव्य निश्चित करा. स्वाभिमान जिवंत ठेवून पाठीचा कणा ताठ ठेवा,” असे ते सांगतात.

सामाजिक कार्याची आवड, निर्भीड स्वभाव, स्पष्टवक्तेपणा, लढाऊ वृत्ती आणि ग्रामस्थांची साथ या बळावर अशोक मुरुख यांनी चोंढी गावाच्या विकासात योगदान दिले आहे. शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट करणाऱ्या विद्यार्थ्यापासून महाराष्ट्रातील तरुण सरपंच, राजकीय सहकारी, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यापर्यंतचा त्यांचा प्रवास ग्रामीण भागातील तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment