---Advertisement---

Sangrampur News : नवीन इमारतीचे भूमिपूजन होऊनही जुन्या इमारतीवर १४ लाखांचा खर्च!

---Advertisement---

संग्रामपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या इमारतीच्या दुरुस्ती-रंगरंगोटीवर लाखोंचा खर्च; प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह!

संग्रामपूर (आकाश बोरसे): नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन होऊन तब्बल दोन वर्षांचा कालावधी उलटत असताना, लवकरच पाडण्यात येणाऱ्या जुन्या इमारतीच्या किरकोळ दुरुस्ती व रंगरंगोटीवर तब्बल १४ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकारी निधीच्या वापराबाबत तसेच संबंधित विभागांच्या प्रशासकीय नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या अंतर्गत येणाऱ्या समग्र शिक्षा गट साधन केंद्र कार्यालयांच्या इमारतींची दुरुस्ती व रंगरंगोटी करण्यात आली. यामध्ये संग्रामपूर पंचायत समितीच्या समग्र शिक्षा गट साधन केंद्राच्या जुन्या इमारतीचाही समावेश करण्यात आला.

या इमारतीच्या किरकोळ दुरुस्ती आणि रंगरंगोटीच्या कामावर सुमारे १४ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याच परिसरात नवीन पंचायत समिती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम प्रस्तावित असून, जुन्या इमारतीचा नवीन बांधकामासाठी लवकरच पाडण्यात येणार असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे, ग्रामविकास विभागाच्या योजनेतून सुमारे ५.२५ कोटी रुपये खर्चाच्या नवीन पंचायत समिती इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन १६ सप्टेंबर २०२४ रोजी आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून हालचाली सुरू असून, कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नियोजनाअभावी सरकारी निधीचा अपव्यय?

नवीन इमारतीचे बांधकाम निश्चित असताना आणि जुन्या इमारतीचे भविष्यात पाडकाम होणार असल्याची शक्यता असताना, त्याच इमारतीच्या दुरुस्ती व रंगरंगोटीवर लाखो रुपये खर्च करण्याची गरज काय होती, असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

शासकीय निधीचा काटेकोर आणि परिणामकारक वापर करण्याचे धोरण शासनाकडून राबविले जात असताना, अल्पावधीत पाडली जाणाऱ्या इमारतीवर एवढा मोठा खर्च झाल्याने संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव होता का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

चौकशीची मागणी होण्याची शक्यता

जुन्या इमारतीवरील १४ लाख रुपयांच्या खर्चाची प्रशासकीय गरज काय होती, कामाला मंजुरी कोणी दिली, कामाची प्रत्यक्ष आवश्यकता किती होती आणि नवीन इमारतीच्या प्रस्तावाची माहिती संबंधित विभागांना त्या वेळी होती का, याची माहिती सार्वजनिक होणे आवश्यक आहे.

सरकारी निधीचा अपव्यय झाला आहे की नियमानुसार आवश्यक दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे, हे स्पष्ट करण्यासाठी संबंधित विभागाने खर्चाचा तपशील, प्रशासकीय मंजुरी आणि कामाची आवश्यकता याबाबत स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे.

नवीन पंचायत समिती इमारतीच्या बांधकामाला लवकरच सुरुवात होणार असताना जुन्या इमारतीवर झालेला १४ लाखांचा खर्च सध्या संग्रामपूरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment