---Advertisement---

Shegaon : बँकेला ५१ लाखांचा गंडा; एकूण ६ लोकांवर गुन्हा दाखल!

---Advertisement---

बँकेकडे तारण असलेली ५१ लाखांची मालमत्ता विकली; शेगावात सहा जणांविरुद्ध गुन्हा!!

शेगाव (डी ललित) : भारतीय स्टेट बँकेकडे ५१ लाख रुपये तारण असलेली मालमत्ता परस्पर विक्री केल्याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय स्टेट बँक, शेगाव शाखेचे मुख्य प्रबंधक यांच्या तर्फे गौरव सुभाषराव जामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संदीप जनकलाल अग्रवाल यांच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध अप क्रमांक ६००/२०२६, कलम ३१८(४), ३(५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ व २ यांनी बँकेकडे एकूण ५१ लाख रुपये तारण असलेली मालमत्ता आरोपी क्रमांक ३ ते ५ यांना विक्री केली. सदर मालमत्ता बँकेकडे तारण असल्याची माहिती असतानाही आरोपी क्रमांक ३ ते ५ यांनी ती बेकायदेशीररीत्या खरेदी केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या व्यवहारातून आरोपींनी संगनमत करून भारतीय स्टेट बँक, शेगाव शाखेची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

घटनास्थळ इसार पेट्रोल पंपाजवळील गाडोदिया नगर, शेगाव तसेच गौळखेड रोडवरील डंपींग ग्राउंडजवळील परिसर असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधित व्यवहाराचा कालावधी २९ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून ४ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंतचा आहे. याप्रकरणी २२ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १.०३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरून गुन्हा दाखल करून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने सपोनि राजेंद्र पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment