चिखली (श्याम देशमुख) : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा अनुभवी नेत्या सौ. रेखाताई खेडेकर यांच्या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
रेखाताई खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून १९९५ ते २००९ या कालावधीत सलग १५ वर्ष चिखली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या भागात मजबूत पकड निर्माण केली होती. मात्र, २००९ मध्ये पक्षाने त्यांचे उमेदवारी तिकीट नाकारल्याने त्या काही काळ राजकीयदृष्ट्या सक्रिय नव्हत्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरदचंद्र पवार गट) प्रवेश करून सुमारे दहा वर्ष पक्षाची निष्ठेने सेवा केली.
अशातच रेखाताई खेडेकर यांनी दिलेला अचानक राजीनामा हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र माध्यमांशी संवाद साधताना रेखाताई यांनी स्वतः तब्येत उत्तम असल्याचे स्पष्ट केले असून, “मी कालच पुण्यावरून चिखलीला परत आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
या विधानानंतर त्यांच्या राजीनाम्यामागील खरी कारणे कोणती याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेखाताई पुन्हा स्वगृही म्हणजेच भारतीय जनता पक्षात परतणार का, अशी चर्चा मतदारसंघात जोर धरू लागली आहे.
त्यामुळे चिखलीतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची चिन्हे दिसू लागली असून, रेखाताईंच्या पुढील पावलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)






