अकोला(आकाश बोडसे):अकोला जिल्ह्यातील तेल्हारा–माळेगाव मार्गावर रविवारी (दि. १ मार्च) दुपारी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. शेरी परिसरात आयशर आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघा अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे माळेगावसह आसपासच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन रामेश्वर वैष्णव आणि साई रामेश्वर वैष्णव हे सख्खे भाऊ असून त्यांच्यासोबत गणेश अपतुरकार हा मित्र दुचाकीवर प्रवास करत होता. तिघेही एकाच दुचाकीवर (ट्रिपल सीट) जात असताना समोरून येणाऱ्या आयशर वाहनाशी त्यांची भीषण धडक झाली. अपघात इतका तीव्र होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या तिसऱ्या मुलाने रुग्णालयात नेत असताना प्राण सोडले.
घटनेची माहिती मिळताच तेल्हारा पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
ट्रिपल सीट प्रवासावरून प्रश्नचिन्ह
अपघातावेळी तिन्ही अल्पवयीन मुले एकाच दुचाकीवर प्रवास करत असल्याची बाब समोर आली आहे. वाहतूक नियमांनुसार दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे कायद्याने गुन्हा आहे. तसेच अल्पवयीन मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना ते रस्त्यावर कसे आले, यावरून पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दोन सख्ख्या भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात हळहळ व्यक्त होत असून, या अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून दिली आहे.
वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक?
- अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास कायदेशीर मनाई
- ट्रिपल सीट प्रवास दंडनीय गुन्हा
- हेल्मेटचा वापर जीव वाचवू शकतो
- वेग मर्यादेचे पालन आवश्यक
तज्ज्ञांच्या मते, ग्रामीण भागात वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पालकांनी मुलांवर नियंत्रण ठेवून त्यांना योग्य वयापर्यंत वाहन न देणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)








