अमरावती,(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 22 जुलै — महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील तेजस्वी संत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतश्रेष्ठ श्री परमहंस परशराम महाराज यांच्या लोककल्याण, अध्यात्म आणि सेवाभावाच्या कार्याची परंपरा आजही अखंडपणे सुरू असून, राज्यभरातील हजारो भक्तांसाठी त्यांचे जीवन प्रेरणास्थान ठरत आहे.
इ.स. १९०० मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी जळतापूर (ता. भातकुली, जि. अमरावती) येथे बळीरामपंत वडनेरकर गुरव व भीमाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच वैराग्याची वृत्ती असलेल्या महाराजांनी लहान वयात गृहत्याग करून जनसेवा, अध्यात्म आणि ईश्वरभक्तीचा मार्ग स्वीकारला. विविध भागांत भ्रमण करत त्यांनी समाजात मानवता, सदाचार आणि सेवाभावाचा संदेश दिला.
श्रीक्षेत्र पिंपळोद (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथे त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. याच ठिकाणी त्यांची समाधी असून ती आज हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बनली आहे.
भक्तांच्या परंपरेनुसार महाराजांच्या जीवनाशी संबंधित अनेक चमत्कार सांगितले जातात. वांझ गाईला पान्हा फुटणे, मृत बैलाला जीवदान मिळणे, खारपाण प्रदेशात गोड पाण्याचे झरे निर्माण होणे तसेच जलकुंड येथील विहिरीतील गोड पाणी हे त्यांच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. श्रीक्षेत्र अंतरगावसह अनेक भागांत पाण्याची समस्या दूर झाल्याचा अनुभवही भक्त व्यक्त करतात.
सध्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी श्री परमहंस परशराम महाराजांची २६ मंदिरे असून बुद्ध पौर्णिमेला जन्मोत्सव आणि होळी पौर्णिमेला पुण्यतिथी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते. या निमित्ताने भजन, कीर्तन, नामस्मरण, पारायण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
महाराजांचे जीवनचरित्र २१ अध्यायांच्या ग्रंथरूपाने प्रकाशित करण्यात आले असून त्याचे नियमित मासिक आणि सामूहिक पारायण आयोजित केले जाते. पंढरपूर, कारंजा लाड, कौंडण्यपूर, अंबादेवी, शेगाव आदी ठिकाणी सामूहिक पारायण सोहळे पार पडले आहेत. भविष्यात महाराष्ट्रासह देशभर हे आध्यात्मिक कार्य अधिक व्यापक करण्याचा सेवाधारी परिवाराचा संकल्प आहे.
श्रद्धा, सेवा, सदाचार आणि लोककल्याणाचा संदेश देणाऱ्या संतश्रेष्ठ श्री परमहंस परशराम महाराजांची शिकवण आजही समाजाला प्रेरणा देत असून त्यांच्या समाधीस्थळासह विविध मंदिरांमध्ये भक्तिभावाची परंपरा अखंड सुरू आहे.









