---Advertisement---

जळगाव जामोदमध्ये बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेला गती; आ. डॉ. संजय कुटे यांचे कडक निर्देश!!

---Advertisement---

जळगाव जामोद (आकाश बोरसे) : मतदारसंघातील प्रत्येक गाव शिवारातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत सर्व हवामानात सुलभ व दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेला गती देण्याचे निर्देश आ. डॉ. संजय कुटे यांनी दिले.

या योजनेचा सविस्तर आढावा २६ एप्रिल रोजी जळगाव जामोद येथील विश्रामगृहात घेण्यात आला. या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अभियंते तसेच स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान योजनेअंतर्गत प्रस्तावित कामांची सद्यस्थिती, निधी उपलब्धता, तांत्रिक अडचणी तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडथळ्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. भूमिअभिलेख विभागाने तात्काळ मोजणी पूर्ण करावी, अतिक्रमण असल्यास पोलीस व तहसील प्रशासनाने समन्वयाने रस्ते मोकळे करावेत, तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात यावी, अशा सूचना आ. डॉ. संजय कुटे यांनी दिल्या.

तसेच पुढील १५ दिवसांत तपशीलवार अॅक्शन प्लॅन सादर करण्याचे निर्देश देत त्यांनी प्रलंबित कामांची यादी, पूर्णत्वाची कालमर्यादा, जबाबदार अधिकारी आणि आवश्यक संसाधनांची माहिती देण्यावर भर दिला.

आ. डॉ. संजय कुटे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असून, रस्त्यांच्या अभावामुळे शेतमाल बाजारात नेण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कामांची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि वेळेत पूर्णता यावर विशेष लक्ष देण्यात यावे. कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा दर्जात तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, अशासकीय सदस्य राजेंद्र हेलगे, संजय कलोरे, गजानन सरोदे, अशोक नानकदे तसेच संग्रामपूर, जळगाव जामोद व शेगाव तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी आणि इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

एकूणच, या बैठकीतून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment