---Advertisement---

अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात बुलढाण्यात धडक मोहीम; ११७ वाहनांवर कारवाई!

---Advertisement---

बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून, राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात ‘नो पार्किंग’ नियमाची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यांच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत ११७ वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे एस.टी. महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट होत असल्याने राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतूक, प्रवासी चढ-उतार आणि बेकायदेशीर पार्किंग रोखण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयाची गंभीर दखल घेत मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी डॉ. प्रियंका नारनवरे यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्यभर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले.

बुलढाणा जिल्ह्यात ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविली जात असून, पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांना बसस्थानक परिसरात विशेष तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथके सातत्याने कारवाई करत आहेत. बुलढाणा, धाड, चिखली, देऊळगाव राजा, अमडापूर, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, खामगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा, जळगाव जामोद आणि शेगाव येथील प्रमुख एस.टी. स्थानक परिसरात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भविष्यातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांची सुरक्षितता, बसस्थानक परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवणे आणि एस.टी. महामंडळाचे उत्पन्न वाढविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment