जळगाव जामोद (आकाश बोरसे) : १२ जून – राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ ही प्रत्यक्षात कर्जमाफी नसून शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आणि कर्जवसुलीची नवी शक्कल असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. योजनेतील जाचक अटींमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचे सांगत या अटी तातडीने रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना मा. उपविभागीय अधिकारी (एसडीओ), जळगाव जामोद यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
तसेच, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी ‘अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाला’ बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या वतीने अधिकृत जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
“शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवावा आणि मागण्यांबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली. तसेच, सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही तर महाराष्ट्रभर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदन सादर करताना तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षाताई वाघ, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अॅड. करीम खान, विधानसभा अध्यक्ष विश्वासराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महादेव भालतडक, मनोहर पाटील, दत्ता डिवरे, नगरसेवक सिद्धार्थ हेलोडे, संदीप वाघ, गजानन भालतडक, अनंत वाघ, दिनेश वाघ, सुहास वाघ, शिवा उगले, पंजाब वाघ, श्रीकृष्ण तुकाराम जाधव, सरपंच गजानन रघुनाथ रोठे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(युवा क्रांती वृत्तसेवा)








