जळगाव जामोद | (आकाश बोरसे) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) 2025-26 ची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. या गुणवत्ता यादीत माधव विद्या मंदिर, जळगाव जामोद येथील विद्यार्थिनी कु. निधी वैशाली रामदास रेवस्कार हिने शहरी गटातून बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
कु. निधी ही डिझायर कोचिंग क्लासेस, खामगाव येथील विद्यार्थिनी असून तिने आपल्या सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि अभ्यासाच्या बळावर जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले आहे.
निधीने यापूर्वीही विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे. RTSE (गणित प्रावीण्य परीक्षा) मध्ये तिने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यात प्रथम क्रमांक, तसेच BTS (भारत टॅलेंट सर्च) परीक्षा मध्ये बुलढाणा जिल्ह्यात द्वितीय व महाराष्ट्र राज्यात विसावा क्रमांक मिळविला आहे.
निधीच्या या यशामुळे तिचे आई-वडील, माधव विद्या मंदिरचे शिक्षक, डिझायर कोचिंग क्लासेसचे मार्गदर्शक तसेच जळगाव जामोद आणि खामगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक आणि नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)









