खामगाव,(आकाश बोरसे) : दि. २० जुलै – लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या ‘अहिल्या संदेश यात्रा’ नियोजनासाठी धनगर समाज महासंघ, जिल्हा बुलढाणा यांची जिल्हास्तरीय बैठक खामगाव येथील शरदभाऊ वसतकार यांच्या कार्यालयात उत्साहात पार पडली.
धनगर समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न पाचपोर यांच्या नेतृत्वात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष श्रीराम पुंडे, प्रदेश उपाध्यक्ष शरद वसतकार, माजी जिल्हाध्यक्ष मनोहर पाचपोर तसेच जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न पाचपोर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
बैठकीत ३ ऑगस्ट रोजी नांदुरा तालुक्यातील निंबा माता श्रीक्षेत्र, निंबोळा येथून ‘अहिल्या संदेश यात्रे’चा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. ही यात्रा नांदुरा, मलकापूर, मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव या सात तालुक्यांतून मार्गक्रमण करणार असून ९ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथे समारोप होणार आहे.
यात्रेदरम्यान गावागावांत जाऊन लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा व सामाजिक योगदानाचा प्रचार-प्रसार करण्यात येणार आहे. तसेच यात्रेचा मार्ग, वेळापत्रक, मुक्काम, नाश्ता व भोजनाची माहिती पत्रकांच्या माध्यमातून कार्यकर्ते व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस नांदुराचे विलास तितरे, संग्रामपूरचे नंदकिशोर पुंडे, जळगाव जामोदचे अशोक भिवटे, शेगावचे अंबादास भिवटे, मलकापूरचे कृष्णकांत सुशीर, खामगावचे प्रल्हाद पातोंडा यांच्यासह रवींद्र गुरव महाराज, निलेश साबे, अनिल पाचपोळ, विजय वसतकार, अशोक करे, विठ्ठल सुशीर, दगडू खोंदले, जनार्दन वरखेडे, श्रीकृष्ण साबे, ज्ञानेश्वर घोंगे, निलेश सोनवणे, गणेश सुशीर, अंबादास माने, गुरवभाऊ अटाळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)










