शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : शेगाव तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करताना शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत, तसेच प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद व्हावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
पावसाअभावी नुकसान झालेली पिके अनेक शेतकऱ्यांनी काढून टाकली असून, पुढील पिकाच्या पेरणीसाठी काही शेतांमध्ये रोटाव्हेटर करण्यात आले आहे. त्यामुळे पंचनाम्याच्या वेळी शेतात नुकसान झालेल्या पिकाचे अवशेष दिसून न आल्यास प्रत्यक्ष झालेले नुकसान नोंदविले जाण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन उपलब्ध फोटो, व्हिडिओ, पीक नोंदी तसेच शेतातील प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करून पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष नितीश भावरकर यांनी तहसीलदारांशी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्याच्या प्रक्रियेतून वंचित राहावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सूचना संबंधित यंत्रणेला द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. यावर तहसीलदारांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
दिव्यांग अंत्योदय योजनेच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष
दरम्यान, मागील काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या दिव्यांग अंत्योदय योजनेच्या प्रश्नाकडेही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांचे लक्ष वेधले. या प्रश्नाची तातडीने दखल घेत पुरवठा अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करून प्रकरण मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले.
यावेळी तालुका सचिव गजानन लांजुळकर, उपाध्यक्ष रोहित भांबेरे, विभाग प्रमुख संदीप मुजाळ, सापुर्डा पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी प्रशासनाने गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका मनसेच्या वतीने यावेळी मांडण्यात आली.








