बुलढाणा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : महिला व बाल विकास विभागामार्फत कोविड-१९, नैसर्गिक किंवा अकस्मात कारणांमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शासन नियमानुसार अनाथ प्रमाणपत्र देण्यात येत आहे. पात्र बालकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.
आई-वडील दोघांचाही नैसर्गिक, अकस्मात किंवा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला असून, त्या वेळी संबंधित बालकाचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्यास अशा बालकांना अनाथ प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे.
अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बसस्थानकाच्या मागे, जोशी नेत्रालयाजवळ, मुठ्ठे ले-आऊट, बुलढाणा येथे प्रस्ताव सादर करावा.
अर्जासोबत विनंती अर्ज, आई-वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (टी.सी.), बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळेचा निर्गम उतारा, जन्म दाखला, जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, पालकांचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड किंवा अन्य ओळखपत्र, कोविडमुळे मृत्यू झाल्यास संबंधित अहवाल (लागू असल्यास) तसेच बालकाचे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडणे आवश्यक आहे.
जिल्हा महिला व बाल विकास विभागाने पात्र बालकांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी शासनाच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तातडीने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.








