बुलढाणा, दि. 14 (जिमाका) :(युवा क्रांती वृत्तसेवा) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक तसेच गट कर्ज योजनांतील लाभार्थ्यांना अधिक सुलभ, पारदर्शक व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ सेवा सुरू करण्यात आली आहे. “One Click Information” या संकल्पनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या या सुविधेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जासंबंधित माहिती आणि विविध प्रक्रियांची सद्यस्थिती थेट व्हॉट्सॲपवर तत्काळ मिळणार आहे.
लाभार्थ्यांनी ८९७६८५५९२१ या क्रमांकावर “Hi” असा संदेश पाठवल्यानंतर त्यांच्यासमोर विविध पर्यायांसह मेनू उपलब्ध होईल. यात महामंडळ व योजनांची माहिती, नवीन नोंदणी मार्गदर्शन, पात्रता प्रमाणपत्र स्थिती व डाउनलोड सुविधा, बँक कर्ज मंजुरी स्थिती तसेच व्याज परतावा दावा स्थिती यासारख्या सेवा मिळणार आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व सेवा ओटीपी आधारित पडताळणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय अर्ज प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी प्रशिक्षण व्हिडिओ तसेच तांत्रिक अडचणी नोंदविण्यासाठी ‘तिकीट जनरेशन’ सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.
या डिजिटल सुविधेमुळे लाभार्थ्यांच्या कार्यालयीन फेऱ्या कमी होऊन अर्ज प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व गतिमानता येणार आहे. परिणामी लाभार्थ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.
महामंडळाने यापूर्वीच अधिकृत मोबाईल ॲप सुरू केले असून, लाभार्थ्यांच्या व्यवसाय विस्तारासाठी संकेतस्थळावर ‘व्यवसायवर्धन’ टॅब देखील सुरू करण्यात आला आहे. भविष्यात ‘E-Market Place’ व्यासपीठ तयार करण्यासाठी महामंडळ प्रयत्नशील असून आगामी काळात थेट व्हॉट्सॲपवरून एल.ओ.आय. अर्ज प्रक्रिया उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हा समन्वयकांनी दिली.







