शेगाव (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि .21 मे-शेगाव नगरपालिकेच्या हद्दीतील आजाद नगर परिसरात सुरू असलेल्या नवीन पाईपलाईन कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कंत्राटदाराकडून कोणतेही योग्य नियोजन न करता रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे खोदून ते अनेक दिवस तसेच उघडे ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, आजाद नगर परिसरात पाच वर्षांपूर्वीच नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती आणि त्याद्वारे नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू होता. असे असताना पुन्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराकडे पुरेशी मजूर यंत्रणा आणि योग्य नियोजन नसल्याने हे काम संथ गतीने सुरू असून नागरिकांचे हाल होत आहेत.
रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने मोठे खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी आठ-आठ दिवस कामच होत नसल्याने वाहनचालक आणि पादचारी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. परिसरातील नागरिकांनी सांगितले की, हे काम दीड महिना उलटूनही पूर्णत्वास गेलेले नाही.

याशिवाय, टेंडरनुसार आवश्यक खोलीपर्यंत खोदकाम न करता केवळ तीन ते चार फूट खोदकाम करून त्यामध्ये दोन पाईप एकाच ठिकाणी टाकण्यात येत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. भविष्यात नळ कनेक्शन देताना मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, शेगाव नगरपालिकेकडून या कामावर कोणत्याही प्रकारचे योग्य सुपरव्हिजन होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींनाही कंत्राटदार दाद देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, नागरिकांनी शेगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी तातडीने लक्ष घालून कामाची चौकशी करावी आणि नागरिकांचा त्रास थांबवावा, अशी मागणी केली आहे.










