---Advertisement---

शांतता समितीची बैठक; बकरी ईद शांततेत व नियमांचे पालन करून साजरी करा : जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांचे आवाहन!

---Advertisement---

बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. 26 बकरी ईद (ईद-अल-अजहा) हा त्याग, बलिदान, सौहार्द आणि शांततेचा संदेश देणारा सण असून तो शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आनंदात व शांततेत साजरा करावा, असे आवाहन डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी केले.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तसेच शांतता समितीचे सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी सांगितले की, सर्व तालुक्यांमध्ये शांतता समितीच्या बैठका पूर्ण झाल्या असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. पोलीस बंदोबस्त मजबूत ठेवण्यात आला असून तात्पुरत्या कत्तलखान्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी शांततेत आणि उत्साहात सण साजरा करावा, असे त्यांनी नमूद केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस, महसूल, नगरपालिका आणि पशुसंवर्धन विभाग सज्ज आहेत. प्रतिबंधित जनावरांची अवैध तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यातील सीमांवर आणि संवेदनशील भागात २४ तास विशेष तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. संशयास्पद हालचालींची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

बैठकीदरम्यान शांतता समितीच्या सदस्यांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. बुलढाणा जिल्ह्याची सामाजिक सलोखा आणि शांततेची परंपरा कायम राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिम, जनगणना आणि आयुष्मान कार्ड योजनेत नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. बीएलओ घरी आल्यास अचूक माहिती द्यावी तसेच आयुष्मान कार्ड योजनेबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हडे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्व मुस्लिम बांधवांना आणि जिल्हावासीयांना ईद-अल-अजहाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment