---Advertisement---

बावनबीर ग्रामपंचायतीतील घरकुल घोटाळा उघड!!

---Advertisement---

गटविकास अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी; संबंधितांवर कारवाईची शक्यता.

संग्रामपूर (आकाश बोरसे): बावनबीर ग्रामपंचायत अंतर्गत घरकुल योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून, गटविकास अधिकारी महादेव पायघन यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत या गैरप्रकाराला दुजोरा मिळाला आहे. यामुळे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक तसेच संबंधित गृहनिर्माण अभियंत्यांवर कारवाईची टांगती तलवार निर्माण झाली आहे.

दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर 22 एप्रिल रोजी गटविकास अधिकारी पायघन यांनी स्वतः पथकासह लाभार्थ्यांच्या घरकुलांची पाहणी केली. या पाहणीत अनेक लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात घरकुल बांधकाम सुरू केले नसतानाही त्यांच्या बँक खात्यात घरकुल योजनेचे हप्ते जमा झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीकडून बांधकाम न केलेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित गृहनिर्माण अभियंत्याने ऑनलाईन जिओ-टॅगिंग करून काम सुरू असल्याचे दाखवले. मात्र प्रत्यक्ष पाहणीत हे जिओ-टॅगिंग बनावट असल्याचे स्पष्ट झाले. काही ठिकाणी इतरांच्या घरांसमोर फोटो काढून ते संबंधित लाभार्थ्यांचे बांधकाम असल्याचे दाखवण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतमधील सत्ताधाऱ्यांशी संबंधित असलेल्या काही लाभार्थ्यांनाही काम न करता आर्थिक लाभ मिळाल्याचे समोर आले आहे. एका लाभार्थ्याने घरकुलाचे काम सुरू न करता पहिला हप्ता १५ हजार रुपये घेतला असून दुसऱ्या हप्त्यासाठी प्रस्तावही पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, प्रत्यक्षात बांधकाम सुरू करणाऱ्या अनेक पात्र लाभार्थ्यांना मात्र ३ ते ४ महिन्यांपर्यंत अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे शासनाच्या घरकुल योजनेची दिशाभूल झाल्याचे स्पष्ट होत असून संबंधित दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढील चौकशीत आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment