बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री प्रकाश अवचार पाटील यांनी 24 मे 2026 रोजी नागपूर येथे माजी केंद्रीय मंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रामविजयजी बुरुंगले हेही उपस्थित होते. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार पाटील यांनी खासदार मुकुल वासनिक यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पक्षाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यानंतर मुकुल वासनिक यांनीही शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
भेटीदरम्यान खासदार मुकुल वासनिक यांनी बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यावर भर देत पक्षापासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा काँग्रेसशी जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रत्येक तालुका व गावपातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी जातीने लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, नाशिक येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीदेखील नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार पाटील यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी प्रकाश पाटील यांचे चिरंजीवही उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)









