बुलढाणा : तब्बल १८ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला पूर्णविराम देत बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या राजकारणात पुन्हा एकदा डॉ. राजेंद्र शिंगणे पर्वाचे दमदार पुनरागमन झाले आहे. बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या निवड प्रक्रियेत माजी मंत्री तथा सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांची अध्यक्षपदी, तर घाटाखालील नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणारे गोविंद मिरगे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.
बँकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजता अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी गोविंद मिरगे यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाला. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोन्ही नेत्यांची अविरोध निवड घोषित करण्यात आली.
डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षपदी आणि गोविंद मिरगे यांच्या उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे घाटावरील आणि घाटाखालील नेतृत्वाला समान प्रतिनिधित्व मिळाल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे. जिल्हा बँकेच्या नेतृत्वात दोन्ही भागांना स्थान मिळाल्याने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने २१ पैकी तब्बल १९ जागांवर विजय मिळवला होता. या दणदणीत विजयामुळे डॉ. शिंगणे यांची अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित मानली जात होती. बुधवारच्या अविरोध निवडीने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले.
सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, संचालक मंडळावरील मजबूत पकड आणि प्रशासकीय कौशल्याच्या जोरावर डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेची धुरा हाती घेतली आहे. तर गोविंद मिरगे यांच्या उपाध्यक्षपदी निवडीमुळे बँकेच्या नव्या नेतृत्वाला घाटाखालील भागाचे प्रभावी प्रतिनिधित्व मिळाले आहे.
निवड जाहीर होताच समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही नेत्यांवर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, सोशल मीडियावरही त्यांच्या निवडीचे स्वागत करणाऱ्या पोस्ट मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत.
तब्बल १८ वर्षांनंतर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या कारभारात पुन्हा एकदा लोकनियुक्त संचालक मंडळाच्या नेतृत्वाची स्थापना झाली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.








