---Advertisement---

Buldhana Health Review Meeting : बुलढाण्यात ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी’ आढावा बैठक; अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश!!

---Advertisement---

बुलढाणा | दि. 15 ऑगस्ट – बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘जिजाऊ सभागृहात’ ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी’ आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई, कुपोषणमुक्ती आणि जिल्ह्यातील नागरिकांची १०० टक्के आरोग्य तपासणी करण्यावर विशेष भर देण्यात आला.

बैठकीला आमदार मनोज कायांदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सकांच्या पथकाने अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळ्यांविरोधात केलेल्या कारवाईचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी कौतुक केले.

मुलींचा जन्मदर वाढणे हे समाजाच्या संतुलित विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रीभ्रूणहत्या आणि अवैध गर्भलिंग निदानासारख्या प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये. अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर विलंब न करता कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

जिल्ह्यातील बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. विशेषतः आदिवासी भागातील बालकांना संतुलित आहार मिळावा आणि कुपोषणाची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम राबवावी, असे त्यांनी सांगितले. तळागाळात आरोग्य सेवा पोहोचविणाऱ्या आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कुपोषणविरोधी उपाययोजनांना अधिक प्रभावी करण्याचे निर्देशही देण्यात आले.

कर्करोग, क्षयरोग (टीबी), उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे वेळेत निदान होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचे १०० टक्के आरोग्य स्क्रीनिंग पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री पाटील यांनी आरोग्य विभागाला दिले. लवकर निदान झाल्यास गंभीर आजारांवर वेळेत उपचार करणे शक्य होते. त्यामुळे आरोग्य तपासणी मोहीम तळागाळापर्यंत प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’ला गती देऊन अधिकाधिक रुग्णालये व दवाखाने या मोहिमेत सहभागी करून घेण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत आयुष्मान कार्ड पोहोचावे आणि योजनेबाबत व्यापक जनजागृती व्हावी, यासाठी प्रशासनाने वेगाने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

बैठकीत नियमित लसीकरणासह विविध आरोग्यविषयक मोहिमांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात सुरू असलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकामांसह नूतनीकरणाच्या कामांची सद्यस्थितीही पालकमंत्र्यांनी जाणून घेतली.

ही कामे दर्जेदार पद्धतीने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

बैठकीतील प्रमुख निर्देश

  • अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई.
  • कुपोषणमुक्तीसाठी विशेष मोहीम राबविणे.
  • नागरिकांचे १०० टक्के आरोग्य स्क्रीनिंग पूर्ण करणे.
  • कर्करोग, टीबी, मधुमेह व उच्च रक्तदाबाचे वेळेत निदान.
  • प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत आयुष्मान कार्ड पोहोचविणे.
  • प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण करणे.
  • आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून आरोग्य सेवा अधिक प्रभावी करणे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment