बुलढाणा (युवा क्रांती वृत्तसेवा ) : दि. २४ एप्रिल -महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करत प्रशासनात पारदर्शकता आणि गती निर्माण करणाऱ्या ‘सहज प्रणाली’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. या उल्लेखनीय कार्यासाठी बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा विद्यमान पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांचा मुंबई येथे विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या वतीने २८ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ‘द्वितीय सेवा हक्क दिन’ निमित्त राज्यस्तरीय गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाच्या सचिव वैशाली राज चव्हाण यांनी पत्राद्वारे दिली आहे.
डॉ. किरण पाटील यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना ‘सहज प्रणाली’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविला. या उपक्रमामुळे नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होऊ लागल्या. प्रशासनातील प्रक्रियांना सुसूत्रता प्राप्त झाली असून नागरिकांचा वेळ व श्रम मोठ्या प्रमाणात वाचले आहेत.
‘सहज प्रणाली’मुळे बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेला सकारात्मक बदल राज्यासाठी दिशादर्शक ठरत असून, इतर जिल्ह्यांनीही हा पॅटर्न अवलंबावा या उद्देशानेच आयोगामार्फत डॉ. पाटील यांचा गौरव केला जात आहे.
या सोहळ्यास राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, मुख्य सचिव तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. डॉ. किरण पाटील यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.







