मुंबई | (युवा क्रांती वृत्तसेवा) दि. १ जुलै २०२६ : आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरणसेवा’ उपक्रमाला आजपासून प्रारंभ झाला आहे.
यंदा राज्यातील ११ जिल्ह्यांतील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत.
उपक्रमांतर्गत वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरज पडल्यास रुग्णवाहिका सेवाही तत्पर ठेवण्यात आली आहे.
याशिवाय पालखी मार्गावर ८ आरोग्य जनजागृती रथांद्वारे केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निवडक ठिकाणी योगसत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे.
कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, गतवर्षी या उपक्रमातून १ लाख ७५ हजारांहून अधिक वारकऱ्यांना थेट चरणसेवा, वैद्यकीय तपासणी व उपचारांचा लाभ मिळाला होता, तर १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचला होता.
यंदा अधिक व्यापक स्वरूपात सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले असून, ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची‘ या संकल्पनेतून अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.









