बुलढाणा,(जिमाका) (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. २८ मे- मेरा युवा भारत, बुलढाणा यांच्या वतीने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), चिखली येथे स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
हा उपक्रम जिल्हा युवा अधिकारी दिक्षा पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. स्वातंत्रवीर सावरकर यांच्या देशभक्तीबरोबरच निसर्गप्रेमाच्या विचारांना उजाळा देणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. त्यानिमित्त आयटीआय परिसरात विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाला आयटीआयचे प्राचार्य बी. बी. बेदरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ए. एन. म्हस्के, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आकाश साळोक, शिक्षकवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते परिसरात कडुनिंबासह विविध देशी प्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली.
स्वातंत्रवीर सावरकर यांच्या राष्ट्रप्रेम व समाजहिताच्या विचारांना उजाळा देत युवकांनी समाजोपयोगी कृतीतून राष्ट्रहित साधण्याचा संकल्प केला. युवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सावरकर जयंतीचा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात यशस्वीरित्या पार पडला.








