शेगाव, दि. 20 जून (युवा क्रांती वृत्तसेवा): शेगाव शहरातील धनगर फैल परिसरात 13 जून रोजी घडलेल्या कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाण प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेले महादेव उर्फ विनोद सुरेश केसकर यांचा नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान 18 जून रोजी मृत्यू झाला. त्यामुळे यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात आता खुनाच्या कलमाची भर घालण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सौ. रेणुका महादेव केसकर (वय 35 वर्षे, रा. धनगर फैल, शेगाव) यांनी 13 जून रोजी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, नितीन सुरेश केसकर, अश्विनी नितीन केसकर, गुड्डी शेंडगे, केशव शेंडगे, गजानन हजारे, जयदीप शेंडगे आणि अजय शेंडगे यांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या पतीला लाकडी काठ्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली होती.
या मारहाणीत महादेव केसकर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना 18 जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर शेगाव शहर पोलिसांनी आधी दाखल असलेल्या गुन्ह्यात खुनाच्या गुन्ह्याची कलमे वाढवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. उपरोक्त आरोपींवर कलम 118 (1), 189 (2), 191 (2), 191 (3), 190, 115 (2), 352, 351 (2) बी एन एस नुसार दाखल करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संदीप बरिंगे करीत आहेत.










