शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) | दि. ४जून –पत्रकारांच्या हितासाठी आणि हक्कासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या टिव्ही अँड डिजिटल मीडिया जर्नालिस्ट असोसिएशनच्या शेगाव तालुकाध्यक्षपदी येथील ख्यातनाम पत्रकार दिनेश महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष फहीम देशमुख यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पहुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये संघटनात्मक बांधणी व तालुकाध्यक्ष नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शेगाव तालुक्याची जबाबदारी दिनेश महाजन यांच्यावर सोपविण्यात आली.
नियुक्तीची घोषणा होताच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त तालुकाध्यक्ष दिनेश महाजन यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना दिनेश महाजन म्हणाले की, “संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी तालुक्यात विविध सामाजिक व व्यावसायिक उपक्रम राबविण्यात येतील. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी संघटना सदैव तत्पर राहील.”
या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास, नानाराव पाटील, इस्माईल इराणी, समीर शेख यांच्यासह अनेक पत्रकार व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनियुक्त अध्यक्षांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








