---Advertisement---

घाटपुरी जगदंबा देवी मंदिर चोरी प्रकरण उघड; आरोपी अटकेत, 3.20 लाखांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त!!

---Advertisement---

बुलढाणा (आकाश बोरसे) : बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या घाटपुरी येथील जगदंबा देवी संस्थान मंदिरातील चोरी प्रकरणाचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून तब्बल 3 लाख 20 हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षकअमोल गायकवाड तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

२४ डिसेंबर २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने घाटपुरी येथील जगदंबा देवी संस्थान मंदिराच्या खिडकीचे गज तोडून मंदिरात प्रवेश केला होता. त्यानंतर देवी व गणपतीच्या मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेण्यात आले होते. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे ७३ हजार रुपये असल्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने आरोपी अमोल काशीराम तेलगोटे (वय 39, रा. रिधोरा, जि. अकोला) याला ताब्यात घेतले. आरोपीकडून 20 ग्रॅम 20 मिली वजनाची सोन्याची लगड जप्त करण्यात आली असून तिची किंमत सुमारे 3 लाख 20 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पीएसआय पंकज सपकाळे, एएसआय राजेंद्र अंभोरे, एलएचसी वनिता शिंगणे, पोलीस कर्मचारी अमोल शेजोळ, अजिस परसुवाले, मनोज खर्डे, शिवानंद हेलगे आणि कैलास ठोंबरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

मंदिर चोरीसारखा संवेदनशील गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणल्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment