शेगाव तालुक्यातील प्रशासकांचा ग्रामविकास मंत्र्यांना इशारा; कामकाजावर बहिष्कार टाकण्याचेही निवेदन!
शेगाव |(डी ललित) : दि. १२ ऑगस्ट – शेगाव तालुक्यातील प्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायतींच्या आर्थिक व्यवहारांवरील निर्बंध शिथील करून अत्यावश्यक विकासकामांसाठी आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या प्रशासकांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे. मागणी मान्य न झाल्यास प्रशासक पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा तसेच ग्रामपंचायतींच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार शेगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, ग्रामपंचायतींमध्ये मोठे आर्थिक व्यवहार करण्यावर निर्बंध असल्याने गावातील अत्यावश्यक विकासकामे आणि नागरी सुविधा पुरविताना अडचणी निर्माण होत असल्याचे प्रशासकांनी निवेदनात नमूद केले आहे.
पाणी, स्वच्छता, पथदिवे आणि विकासकामांवर परिणाम
आर्थिक अधिकारांवरील निर्बंधांमुळे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, दिवाबत्ती, स्ट्रीट लाईट, १५वा वित्त आयोग, जनसुविधेची कामे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमधील विकासकामे तसेच आपत्कालीन स्वरूपाची कामे पूर्ण करणे कठीण झाले असल्याचे प्रशासकांचे म्हणणे आहे.
गावातील विकासकामे रखडल्याने नागरिकांच्या रोषाला प्रशासकांना सामोरे जावे लागत असून ग्रामपातळीवर असंतोष निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून विशेष परवानगीची मागणी
गावातील अत्यावश्यक नागरी सुविधांची कामे मार्गी लावण्यासाठी आवश्यक आर्थिक व्यवहार करण्याची विशेष परवानगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावरून तातडीने देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी प्रशासकांनी केली आहे.
ही परवानगी देणे शक्य नसल्यास प्रशासक पदाचा सामूहिक राजीनामा मंजूर करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. शासन किंवा प्रशासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास शेगाव तालुक्यातील प्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायतींच्या सर्व कामकाजावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या निर्णयानंतर निर्माण होणाऱ्या प्रशासकीय व नागरी अडचणींसाठी शासन व प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनावर कल्पना विनय तायडे, ज्ञानेश्वर दादाराव शेजोळे, सुख्खा परविन अमीर खान, शितल अमोल भांगे, सजेश्वरी राजश्री गवई, शारदा गजानन ससे, पवन डी. बारिंगे, पल्लवी धनराज खोल, अमोल ज्ञानदेव गोळे, महेंद्र सरदाराम भोजने, संतोष लक्ष्मण गावंडे, सुनीता आत्माराम वानखडे, अरुणा गजानन बोबडे, श्रद्धा योगेश पिसे, लक्ष्मण संभाजी गवई आणि केशव भा. हिंगणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (युवा क्रांती वृत्तसेवा)








