बुलढाणा, (जिमाका)(युवा क्रांती वृत्तसेवा) : दि. २९ मे–राज्यातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या तसेच सन २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चिती व आरक्षण चक्रानुक्रमे फिरविण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असून नागरिकांकडून हरकती व सूचना २५ जून २०२६ पर्यंत मागविण्यात आल्या आहेत.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ तसेच अद्ययावत नियम, परिपत्रके आणि शासन आदेशांच्या अधीन राहून प्रभाग रचना, आरक्षण निश्चिती आणि निवडणूक प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कालमर्यादेचा कोणत्याही परिस्थितीत भंग होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
आरक्षण प्रक्रियेत तलाठी, मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक यांचा सक्रिय सहभाग राहणार आहे. सर्व तहसीलदारांना संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आरक्षण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून गटविकास अधिकाऱ्यांनाही ग्रामसेवकांच्या माध्यमातून प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रियेस सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम
- विशेष ग्रामसभेची सूचना देणे – ०८ जून २०२६
- विशेष ग्रामसभा घेऊन आरक्षण सोडत काढणे – १२ जून २०२६
- प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – १७ जून २०२६
- प्रारूप आरक्षण प्रसिद्ध करणे – १९ जून २०२६
- हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी – १९ जून ते २५ जून २०२६
- प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय – ०३ जुलै २०२६
- अंतिम अधिसूचनेस जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता – ०८ जुलै २०२६
- अंतिम प्रभाग रचना व आरक्षण प्रसिद्ध करणे – १० जुलै २०२६
प्रशासनाने नागरिकांना या कार्यक्रमाची नोंद घेण्याचे आवाहन केले असून आरक्षणासंदर्भात काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या निर्धारित कालावधीत सादर करण्याचे आवाहन केले आहे.








