---Advertisement---

जलंब रेल्वे स्थानकावर महिलेचा जीव वाचविण्यात रेल्वे पोलिसांना यश; बिहारमधील कुटुंबीयांचा शोध!

---Advertisement---

शेगाव | (डी ललित) : जलंब रेल्वे स्थानकावरील मुख्य रेल्वे मार्गावर आत्महत्येच्या उद्देशाने उभ्या असलेल्या एका २४ वर्षीय महिलेचा जीव रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला. एवढेच नव्हे तर तिची ओळख पटवून बिहारमधील कुटुंबीयांशी संपर्क साधत तिला सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात आला. या संवेदनशील व तत्पर कारवाईबद्दल रेल्वे पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

20 जुलै 2026 रोजी जलंब रेल्वे स्थानकावरील मेन लाईनवर एक महिला उभी असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार पांडुरंग वसु यांच्या सूचनेनुसार सहायक फौजदार सुनील कवळकर, पोलीस अंमलदार किरण डोके व बबन शिरसाट हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेला सुरक्षितपणे रेल्वे रुळावरून बाजूला करून तिचा जीव वाचविला.

त्यानंतर महिलेला रेल्वे पोलीस ठाणे, शेगाव येथे आणून चौकशी करण्यात आली. सुरुवातीला तिने केवळ कविता देवी उमेश कुशवाह (वय २४) व सुखलहिया एवढीच माहिती दिली. ती केवळ बिहारी भाषेत बोलत असल्याने अधिक माहिती मिळविणे आव्हानात्मक ठरत होते.

यावेळी प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात व पोलीस हवालदार पांडुरंग वसु यांनी संयम, संवादकौशल्य आणि बौद्धिक कौशल्याचा वापर करून महिलेची संपूर्ण ओळख पटवली. तिचा पत्ता पोलीस चौकी हरपूर, थाना अदापूर, जिल्हा मोतिहारी (बिहार) असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर बिहार पोलिसांशी समन्वय साधून तिच्या आई-वडिलांचा व पती उमेश प्रसाद यांचा संपर्क क्रमांक मिळविण्यात आला. पतीला घटनेची माहिती देण्यात आली असून ते पत्नीला घेण्यासाठी शेगावकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पतीला येण्यास विलंब होणार असल्याने महिलेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तिला सखी वन स्टॉप सेंटर, बुलढाणा येथे प्रशासकीय ताब्यात सुरक्षितरीत्या दाखल करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक (लोहमार्ग) संदीप पालवे व उपविभागीय पोलीस अधिकारी (लोहमार्ग) वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात यांच्या नेतृत्वात सहायक फौजदार सुनील कवळकर, पोलीस हवालदार पांडुरंग वसु, पोलीस अंमलदार किरण डोके, बबन शिरसाट आणि महिला पोलीस शिपाई सुलोचना कांबळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment