सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत 26 ते 29 मे दरम्यान धम्ममय वातावरण निर्माण करण्याचा संकल्प
जलम (आकाश बोरसे) : सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जलंब ते पातुर्डा मार्गावर भव्य धम्म पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पदयात्रा दिनांक 26 मे ते 29 मे 2026 दरम्यान पार पडणार आहे.
या धम्म पदयात्रेचे नेतृत्व पूज्यनीय भंते ज्ञानज्योती महास्थाविर करणार असून त्यांच्या सोबत पूज्यनीय भिक्षू संघ, उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सामाजिक क्रांती अभियानाच्या माध्यमातून ऐतिहासिक व पवित्र भूमीला उजाळा देणे, अभिवादन करणे तसेच शासनाने या स्थळांची दखल घ्यावी यासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुजित बांगर यांनी समाज बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिसरात संघटितपणे धम्ममय वातावरण निर्माण करण्याचे आवाहन केले आहे.
ही धम्म पदयात्रा जलंब येथून प्रारंभ होऊन माटरगाव, मच्छिंद्रखेड, तरोडा डी, येऊलखेड, कालखेड, मनसगांव, खिरोडा मार्गे पातुर्डा येथे पोहोचणार आहे. या मार्गावरील सर्व समाज बांधवांनी पदयात्रेची नोंद घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)









