---Advertisement---

जळगाव जामोदमध्ये जमीन फसवणूक प्रकरण; सह दुय्यम निबंधक सुनील चव्हाणांसह ६ जणांवर गुन्हा दाखल!!

---Advertisement---

जळगाव जामोद |(आकाश बोरसे): जळगाव जामोद शहरात जमीन व्यवहारातील मोठ्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आले असून, सह दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण यांच्यासह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, जळगाव जामोद येथील रहिवासी मनीषकुमार भिकमचंद गांधी यांनी याबाबत तक्रार दाखल केली. शहरातील शिट नंबर १५ सी, प्लॉट नंबर ५६ ही ‘ब वर्ग’ प्रकारातील जमीन आरोपींकडून विक्रीसाठी दाखविण्यात आली होती. या जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी शासनाची विशेष परवानगी आवश्यक असतानाही फिर्यादीकडून तब्बल ५ लाख ७० हजार रुपये घेऊन सौदाचिट्ठी करण्यात आली.

दरम्यान, शासनाची परवानगी प्रलंबित असताना आरोपींनी संगनमत करून शासकीय नोंदींमध्ये संगणकीय फेरफार केल्याचा आरोप आहे. ‘ब वर्ग’ जमीन ‘अ वर्ग’ धारणाधिकारात रूपांतरित दाखवत आखीव पत्रिकेमध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर सह दुय्यम निबंधक सुनील चव्हाण यांनी संबंधित मालमत्तेचे खरेदीखत मो. मुस्ताक यांच्या नावे करून दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पुढील आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:

  1. अ. हबीब मो. मुसा
  2. मो. शरीफ मो. मुसा
  3. मो. मुस्ताक मो. इसा उर्फ मुस्ताक भाईजान
  4. एजाज मुस्ताक देशमुख
  5. मो. साबीर अ. हबीब
  6. सह दुय्यम निबंधक सुनील पंढरी चव्हाण

सर्व आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेरूळकर पुढील तपास करत आहेत.

शासकीय अधिकाऱ्याचाच या कथित फसवणूक प्रकरणात सहभाग समोर आल्याने महसूल विभागात मोठी चर्चा सुरू झाली असून, या प्रकरणात आणखी कोणकोणाची नावे समोर येतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.(युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment