---Advertisement---

Khamgaon Gambling Raid: शेलोडीतील कथित जुगार अड्ड्यावर मध्यरात्री SDPO पथकाचा छापा; 8.43 लाखांचा मुद्देमाल जप्त, शिवसेना (शिंदे गट) तालुकाप्रमुखासह 13 जणांवर गुन्हा!!

---Advertisement---

खामगाव |(युवा क्रांती वृत्तसेवा) : खामगाव तालुक्यातील शेलोडी परिसरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या एका कथित जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी (SDPO) यांच्या विशेष पथकाने मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम, वाहनांसह एकूण 8 लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, शिवसेना (शिंदे गट) चे तालुकाप्रमुख यांच्यासह 13 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेलोडी येथील एका टिनशेडमध्ये काही व्यक्ती ‘एक्का-बादशहा’ हा जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर SDPO पथकाने मध्यरात्री छापा टाकला. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून तालुकाप्रमुख शिवसेना ( शिंदे) यांचे नाव समोर आल्याने खामगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पदावर असलेल्या व्यक्तीचे नाव या कारवाईत आल्यामुळे विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, स्थानिक पातळीवर या कथित जुगार अड्ड्याला राजकीय संरक्षण होते का, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू असली तरी याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही पुष्टी झालेली नाही. तसेच काही ठिकाणी ही कारवाई अलीकडील राजकीय घडामोडींशी जोडून पाहिली जात असली तरी त्यालाही कोणताही अधिकृत आधार उपलब्ध नाही.

या कारवाईनंतर शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून संबंधित तालुकाप्रमुखावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.

पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून, जप्त मुद्देमाल, घटनास्थळावरील पुरावे आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment