बुलढाणा (जिमाका)(युवा क्रांती वृत्तसेवा): दि. 30 जुलै-राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’ ची प्रभावी अंमलबजावणी करून एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, असे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. कर्जबाजारीपणामुळे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करण्याचेही त्यांनी सांगितले.
सहकार व महसूल विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत प्रधान सचिव प्रवीण दराडे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
योजनेतील प्रमुख मुद्दे
- राज्यातील 32 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ.
- नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान.
- पहिल्या टप्प्यात 16.96 लाख कर्जखात्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध.
- दुसरी लाभार्थी यादी लवकरच जाहीर होणार.
- 31 मार्च 2026 पर्यंत पोर्टलवर दर्शविलेली थकबाकीची रक्कमच अंतिम ग्राह्य राहील.
- 1 एप्रिल 2026 नंतरचे व्याज आकारले जाणार नाही, यास सर्व बँकांची लेखी संमती.
कर्जमुक्तीची प्रक्रिया
शेतकऱ्यांनी पोर्टलवरील रक्कम मान्य असल्यास आधार प्रमाणीकरण करावे. प्रमाणीकरणानंतर कर्जमाफीची पावती मिळेल. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम डीबीटीद्वारे थेट कर्जखात्यात जमा केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज बेबाकी प्रमाणपत्र देण्यात येईल आणि नवीन पीक कर्जासाठी ते पात्र ठरतील.
तक्रार असल्यास काय?
पोर्टलवरील रक्कम किंवा इतर माहिती चुकीची वाटल्यास शेतकरी पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारींचे निवारण जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती करणार आहे.
एनपीए खात्यांसाठी विशेष सवलत (Haircut)
थकीत कालावधीनुसार बँकांना 35% ते 85% पर्यंत विशेष सवलत (Haircut) देण्यात येणार असून त्यामुळे तडजोडीची प्रक्रिया सुलभ होणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
पहिल्या यादीत नाव नसलेल्या पात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी स्पष्ट केले.










