वरुड (आकाश बोरसे) : वरुड येथे १७ एप्रिल ला आपत्कालीन लोडशेडिंगमुळे वानखेड ईजी व पाच फिटर लाईन रात्री दहा वाजता सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, रात्री वरुड परिसरातील महावितरण कार्यालयाने सर्व सहा फीडर रात्री दहा वाजताच बंद ठेवले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी वरुड येथील महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान महावितरण प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला पाचारण केले. पिंप्री काथरगाव गट ग्रामपंचायतचे सरपंच पती तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव गणेश टापरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
“जोपर्यंत वीजपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत येथून हलणार नाही,” असा ठाम पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शेवटी रात्री १ वाजून १५ मिनिटांनी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत भविष्यात अशा प्रकारे अचानक वीजपुरवठा खंडित करू नये, अशी मागणी केली.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)








