अवैध देशी दारूसह आरोपी ताब्यात; 93 हजारांचा मुद्देमाल जप्त.
मलकापूर (आकाश बोरसे) : १० जून २०२६-जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध देशी दारुची वाहतूक करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्याच्याकडून सुमारे 93 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
9 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, एक इसम आपल्या मोटारसायकलवरून विनापरवाना देशी दारुची चोरटी वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उमाळी शिवारात सापळा रचून नाकाबंदी केली.
यावेळी मोहन नयनसिंग जाधव (वय 37, रा. गिरणी, ता. मलकापूर) याला संशयास्पद स्थितीत थांबवून तपासणी केली असता, त्याच्याकडे अवैध देशी दारुचे 10 बॉक्स आढळून आले.
जप्त केलेला मुद्देमाल
- देशी दारुः 10 बॉक्स – किंमत 43,200 रुपये
- मोटारसायकलः एक – किंमत 50,000 रुपये
- एकूण किंमतः 93,200 रुपये
आरोपी मोहन नयनसिंग जाधव याच्याविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही व त्यांच्या पथकातील प्रताप बाजड, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, दिनेश बकाले, युवराज राठोड, पूजा साळवे, कोमल इंगळे आणि मनोज खरडे यांनी केली. (युवा क्रांती वृत्तसेवा)








