---Advertisement---

Malkapur News : मलकापूर Railway Station Down Sideला तिकीट घर, वेटिंग रूमसह FOBची मागणी!!

---Advertisement---

RPIचे ता. अध्यक्ष भिवा भाऊ चोपडे यांच्या नेतृत्वाखाली DRMकडे निवेदन; सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी!

मलकापूर (डी ललित) : मलकापूर रेल्वे स्थानकाच्या डाउन साईडला स्वतंत्र तिकीट घर, प्रवाशांसाठी वेटिंग रूम तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पादचारी पूल (FOB) उभारण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI)च्या वतीने करण्यात आली आहे. RPIचे तालुकाध्यक्ष भिवा भाऊ चोपडे यांच्या नेतृत्वाखाली २ सप्टेंबर रोजी भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे प्रबंधकांकडे (DRM) निवेदन सादर करण्यात आले.

मलकापूर रेल्वे स्थानक हे शहरासह परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. स्थानकाच्या डाउन साईडला मुक्ताईनगर, कुह्रा, काकोळा तसेच पंतनगर, एकतानगर, रेल्वे क्वार्टर्स आणि फातिमानगर परिसरात मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. मात्र, रेल्वे प्रवासासाठी तिकीट काढताना या नागरिकांना अप साईडला जावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याचे RPIने निवेदनात नमूद केले आहे.

विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग, रुग्ण तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांना या समस्येचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. डाउन साईडला स्वतंत्र तिकीट खिडकी आणि वेटिंग रूम उपलब्ध करून दिल्यास प्रवाशांची गैरसोय कमी होण्यासोबतच मुख्य स्थानकावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोका टाळण्यासाठी FOBची मागणी

डाउन साईड परिसरातील नागरिकांना बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आणि शासकीय कार्यालयांकडे ये-जा करताना रेल्वे मार्गामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पादचारी पूल (Foot Over Bridge) उभारणे आवश्यक असल्याचे RPIने म्हटले आहे.

FOB उभारल्यास पंतनगर, एकतानगर, रेल्वे क्वार्टर्स, फातिमानगर तसेच डाउन साईड परिसरातील हजारो नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल. तसेच रेल्वे रुळ ओलांडताना होणारा अपघाताचा धोका टाळण्यास मदत होईल.

RPIने डाउन साईडला तिकीट घर व वेटिंग रूम सुरू करणे, FOBला मंजुरी देऊन तातडीने बांधकाम करणे, तसेच प्रकाश व्यवस्था, पिण्याचे पाणी, आसन व्यवस्था आणि स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक सुविधांसाठी प्रस्ताव तयार करावा, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली.

या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागरिकांना सोबत घेऊन लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष भिवा भाऊ चोपडे, शहराध्यक्ष अशोक भालशंकर, तालुका उपाध्यक्ष मुख्तार खान, तालुका सचिव कादर शेख करीम शेख, रफीक साहेब, अंकित दादा चोपडे, असित भैय्या इंगळे, जुबेर खान यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी उपस्थित होते. (युवा क्रांती वृत्तसेवा)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment