नांदुरा | (युवा क्रांती वृत्तसेवा) : नांदुरा रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 22 वर्षीय युवकाला रेल्वे पोलिसांनी वेळेवर मदत करून त्याचे प्राण वाचवले. उपचारानंतर युवकाची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला सुरक्षितपणे भुसावळकडे रवाना करण्यात आले.
रेल्वे पोलीस ठाणे शेगाव अंतर्गत रविवारी (12 जुलै) कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदारांना प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर एक अनोळखी युवक बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोणताही विलंब न करता युवकाला प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदुरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
उपचारानंतर युवक शुद्धीवर आला. त्याने आपले नाव समीर अहमद तडवी (वय 22 वर्षे), रा. तडवी कॉलनी, यावल, जि. जळगाव असे सांगितले.
चौकशीत त्याने सांगितले की, तो ट्रेन क्रमांक 12139 सेवाग्राम एक्सप्रेसने मित्रांसोबत नागपूर येथे ताजुद्दीन बाबा यांच्या शाही संदल कार्यक्रमासाठी जात होता. प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने तो नांदुरा रेल्वे स्थानकावर उतरला आणि त्यानंतर बेशुद्ध झाला.
रेल्वे पोलिसांनी तत्काळ त्याच्या वडिलांशी संपर्क साधून युवक सुरक्षित असल्याची माहिती दिली. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला भुसावळ मेमो ट्रेनने सुरक्षितपणे भुसावळच्या दिशेने रवाना करण्यात आले.
ही संपूर्ण मदत व बचाव कारवाई रेल्वे पोलीस ठाणे शेगावचे प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये ओम साई फाउंडेशन, नांदुरा तसेच आरपीएफचे श्री. सोळंके यांनीही मोलाचे सहकार्य केले.
यावेळी प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात यांनी रेल्वे प्रवाशांनी कोणतीही आपत्कालीन अडचण निर्माण झाल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.









