शेगाव | (युवा क्रांती वृत्तसेवा) : मूळ पहूरपूर्णा येथील जुन्या गावठाणातील घरांची ग्रामपंचायत नमुना ८ मध्ये नोंद करण्याच्या मागणीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी, महसूल विभाग, खामगाव यांना निवेदन देण्यात आले. दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी मनसेने निवेदन दिल्यानंतर पंचायत समिती, शेगावमार्फत दि. १४ सप्टेंबर रोजी जुन्या गावठाणाचे प्रत्यक्ष सर्वेक्षण व पंचनामा करण्यात आला. या पाहणीत जुन्या गावठाणात आजही ५५ कुटुंबे वास्तव्यास असल्याचे समोर आल्याचे मनसेकडून सांगण्यात आले. त्यामुळे नमुना ८ नोंदीचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनावेळी SDO यांनी नमुना ८-अ संदर्भात आपण मार्गदर्शन करू शकत नसल्याचे सांगितल्याने मनसे तालुकाध्यक्ष नितीश भावरकर यांनी प्रशासनाला सवाल उपस्थित केला. हा विषय आपल्या अधिकारक्षेत्रात नसल्यास पंचायत समितीकडून पत्र व अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी स्पष्ट पत्र पाठविणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना या प्रश्नाच्या निर्णयासाठी प्रतीक्षा करावी लागत असून त्यांचे नुकसान होत असल्याचे भावरकर यांनी नमूद केले.
पंचायत समितीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला असून अहवाल पाठविण्याची कार्यवाही केली असताना SDO कार्यालयाकडून आजपर्यंत स्पष्ट दिशा का देण्यात आली नाही, असा प्रश्नही मनसेच्या वतीने उपस्थित करण्यात आला. तसेच सन २०१० पर्यंत नमुना ८ मध्ये नोंद असलेल्या घरांच्या नोंदी त्यानंतर कुठे गेल्या, त्या बंद अथवा रद्द करण्याचा आदेश कोणी दिला आणि त्यासाठी कोणता अधिकृत आधार वापरण्यात आला, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली.
मनसेच्या निवेदनातील मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर SDO यांनी संबंधित पत्र तातडीने पाठवून आवश्यक कार्यवाही करण्याची हमी दिल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली. त्यामुळे आता दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्यक्ष पत्रव्यवहार व पुढील कार्यवाही कितपत जलद होते, याकडे पहूरपूर्णा येथील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
मनसे जिल्हाध्यक्ष अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष परमेश्वर लाहुडकर, वाहतूक सेना अध्यक्ष राम इंगळे, सचिन नागे, ज्ञानेश्वर नंदाने, दुर्गेश कोरडे, प्रकाश तायडे, गजानन वाघमारे, गजानन बकाल, केशव सुलताने, गोपाल बघे, राहुल शेगोकार, सदाशिव सपकाळ, सागर शेलारकर, शुभम रेवस्कर, मोहम्मद मतीन, राहुल वानखेडे, वैभव उमाळे यांच्यासह पहूरपूर्णा येथील ग्रामस्थ व मनसे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, SDO कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार पत्रव्यवहार आणि पुढील कार्यवाही प्रत्यक्षात कधी होते, यावर या ५५ कुटुंबांच्या नमुना ८ नोंदीच्या प्रश्नाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. प्रशासनाकडून पुन्हा दिरंगाई झाल्यास ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने पुढील भूमिका घेण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.








