मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात ग्रामपंचायत पळशी (झाशी)चा डंका; तालुक्यात प्रथम क्रमांक!
संग्रामपूर(आकाश बोरसे) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत पळशी (झाशी) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानात सुरुवातीपासून सक्रिय सहभाग घेत ग्रामपंचायतीने विविध विकासकामांच्या जोरावर सर्वाधिक गुण मिळवत मानाचा प्रथम क्रमांक मिळवला.
ग्रामपंचायत पळशी (झाशी)च्या सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर “एक कॉल प्रॉब्लेम सॉल” या ब्रीदवाक्यांतून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती दिली. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, ऑनलाईन सेवा, शाळांमधील विकासकामे, अंगणवाडीत चिमुकल्यांसाठी उपक्रम, लोकसहभागातून विकास, व्यायामशाळा सुविधा, वाचनालयासाठी पुस्तके व सुविधा, जनावरांसाठी पाण्याचे हौद आदी विविध उपक्रम राबविण्यात आले.
यासोबतच ग्रामपंचायत भवन, शाळा, अंगणवाडी, बुद्ध विहार आणि व्यायामशाळेची रंगरंगोटी व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्व धर्म समभाव जपत गावात विकासाची नवी दिशा निर्माण करण्यात ग्रामपंचायतीला यश आले.
सरपंच प्रियंका मेटांगे यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार
सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे यांना यापूर्वीही विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. नाशिक येथे गुरुमाऊली तसेच न्यायमंत्री श्री. संजय शिरसाट यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच पुरस्कार, बुलढाणा येथे लोकमत अवार्ड, लोणावळा-पुणे येथे अखिल भारतीय सरपंच परिषद पुरस्कार, छत्रपती संभाजीनगर येथे पहाट फाउंडेशन पुरस्कार, अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय आदर्श महिला पुरस्कार तसेच नागपूर येथे सकाळ गौरवगाथा सन्मान मिळाला आहे.
याशिवाय पंचायत समिती संग्रामपूर आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध ठिकाणी शाल, श्रीफळ आणि साडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
15 लाखांच्या बक्षिसाचे मानकरी
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात प्रथम क्रमांक मिळवत ग्रामपंचायत पळशी (झाशी) यांनी तब्बल 15 लाख रुपयांच्या बक्षिसाचे मानकरी होण्याचा मान मिळवला आहे. श्री शंकरजी महाराजांच्या आशीर्वादाने गावाचे नाव तालुक्यासह जिल्ह्यात उज्ज्वल झाल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या यशासाठी तहसीलदार प्रशांत पाटील, गटविकास अधिकारी माधव पायघन, सचिव हेमंत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, कर्मचारी, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गट महिला, ग्रामस्थ आणि पत्रकार बांधवांचे विशेष योगदान असल्याचे सरपंच प्रियंका मेटांगे यांनी सांगितले. (युवा क्रांती वृत्तसेवा)









