बुलढाणा I दि. २८ (युवा क्रांती वृत्तसेवा) : देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या वतीने रविवार, २८ जूनपासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम देशभर सुरू करण्यात आली. या मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते मेहकर येथील लसीकरण केंद्रावर करण्यात आला. यावेळी त्यांनी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून मोहिमेची सुरुवात केली.
यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, देशभरातील सुमारे १५.६ कोटी बालकांना या मोहिमेअंतर्गत पोलिओ प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात येणार आहेत. भारताने मिळविलेला पोलिओमुक्त देशाचा दर्जा कायम राखण्यासाठी प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आरोग्य विभागाने या मोहिमेसाठी व्यापक नियोजन केले असून ग्रामीण व शहरी भागांमध्ये विशेष लसीकरण बूथ उभारण्यात आले आहेत. प्रथम दिवशी बूथवर लसीकरण करण्यात येणार असून त्यानंतर पुढील पाच दिवस आरोग्य पथके घरभेटी देऊन लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजणार आहेत.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, “पोलिओ हा कायमस्वरूपी अपंगत्व आणणारा गंभीर आजार आहे. त्यामुळे ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना जवळच्या पोलिओ लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन लसीकरण करून घ्यावे.”
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेच्या माध्यमातून देशातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभाग, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि वैद्यकीय कर्मचारी यंत्रणा सक्रियपणे कार्यरत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.










