मुंबई | (आकाश बोरसे) : राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुधवारी विधानभवनासमोर आक्रमक आंदोलन छेडले. सरसकट कर्जमुक्ती, पीकविमा, शेतमालाला हमीभाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी तुपकर शेतकऱ्यांसह विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले.
मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलकांनी विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तुपकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यांच्या प्रती विधानभवनाच्या दिशेने फेकल्या तसेच सोयाबीन व कापूस उधळून सरकारचा निषेध केला. “सरसकट कर्जमुक्ती द्या”, “शेतकऱ्यांच्या घामाची किंमत द्या”, “सरकारने दिलेला शब्द पाळा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या अचानक घडलेल्या आंदोलनामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली.

या आंदोलनाची पार्श्वभूमी म्हणजे १५ ते १९ जूनदरम्यान बुलढाणा येथे रविकांत तुपकर यांनी केलेले अन्नत्याग आंदोलन होय. त्या आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बिघडल्याने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकरी प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर तुपकर यांनी आंदोलन स्थगित केले होते.
मात्र, आश्वासनानंतरही बैठक न होणे आणि कर्जमुक्ती, पीकविमा तसेच इतर मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप करत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली. बुधवारी सकाळी सुमारे १० वाजता त्यांनी समर्थकांसह विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर धडक देत आंदोलन केले.
घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून रविकांत तुपकर आणि त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले. त्यांना मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा विधानभवनाच्या दारात पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (युवा क्रांती वृत्तसेवा)










