संग्रामपूर (युवा क्रांती वृत्तसेवा): दि. 16 एप्रिल 2026 ला तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने तहसीलदार, संग्रामपूर यांना निवेदन देत औषध विक्रेत्यांवर होत असलेल्या आधारहीन व बदनामीकारक आरोपांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे प्रशासनाकडून तपासणी व कारवाई सुरू असताना दुसरीकडे समाजात बदनामी होत असल्याने औषध विक्रेत्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, सर्व सभासद शासनाच्या नियमांनुसार तसेच ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार व्यवसाय करत असून 24 तास सेवा, बिलासह व्यवहार व औषध साठवणुकीचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जातात. संग्रामपूर तालुका संघटना राज्यात अग्रणी असून औषध विक्रेत्यांनी जनसेवा व रुग्णसेवेत आदर्श निर्माण केल्याचा दावा करण्यात आला आहे.
मागील काही काळापासून काही व्यक्तींमार्फत ‘नशेची औषधे, गुंगी आणणारी औषधे व अवैध औषधे विकली जातात’ असे आरोप केले जात असून हे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे व पूर्वग्रहदूषित असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने संग्रामपूर तालुक्यात दोन वेळा तपासणी व कार्यशाळा घेतली. या तपासणीत कोणत्याही प्रकारचे अवैध किंवा नशेची औषधे आढळून आले नसल्याचे स्पष्ट झाले. काही किरकोळ त्रुटींवर नियमांनुसार कारवाई करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले.
संघटनेने आपल्या भूमिकेत म्हटले आहे की, “आम्ही सामाजिक आरोग्याची जबाबदारी जपत व्यवसाय करतो. खोटे आरोप व बदनामी सहन केली जाणार नाही. चुकीचे आढळल्यास कारवाईला सहकार्य करू; मात्र बदनामीच्या हेतूने समाजात भ्रम निर्माण करणे थांबवावे.”
दरम्यान, बदनामी व सामाजिक अवहेलना थांबली नाही तर औषध विक्री बंद करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. “अशा परिस्थितीत निर्माण होणाऱ्या अडचणींसाठी प्रशासन जबाबदार राहील,” असे स्पष्ट करण्यात आले.
प्रशासनाची भूमिका
तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले की, फार्मासिस्ट संघटनेचे निवेदन प्राप्त झाले असून आरोप होणे दुर्दैवी आहे. संबंधित प्रकरणी तपासणी सुरू आहे. फार्मासिस्टांनी नियमांचे पालन करून आरोग्य सेवा सुरू ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
तालुका आरोग्य अधिकारी चंद्रशेखर मारोडे यांनी ग्रामीण भागात फार्मासिस्ट हे आरोग्य सेवेतील महत्त्वाचा दुवा असल्याचे नमूद करत त्यांनी सेवा अखंडित ठेवावी, असे सांगितले.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गजानन गिरके यांनी स्पष्ट केले की, मार्च महिन्यात झालेल्या तपासणीत झोपेच्या गोळ्या, गर्भपाताची औषधे किंवा गुंगी आणणारी औषधे आढळून आलेली नाहीत. काही ठिकाणी आढळलेल्या त्रुटींवर औषध व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 व नियम 1945 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.









